Sunday, November 23, 2014

आम्ही सुरुवात केली आहे!


विधानसभा निवडणूक निकालाला एक महिना झाला. अनेक घडामोडी घडल्या. आता नवी सत्ता समीकरणे तयार होतील, असा आभास निर्माण झाला. प्रत्यक्षात तसे घडले नाही.

महाराष्ट्राची ही विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. त्यामध्ये जनादेशाचे संपूर्ण वैचारिक परिवर्तन दिसले. भारतीय जनता पार्टीला एक कोटी सत्तेचाळीस लाख मतांसह२७.८ टक्के मते मिळाली. शिवसेनेला १९.३ टक्के मते मिळाली. काँग्रेसच्या मतांचा वाटा १८ टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसचा १७.२ टक्के होता. याचे तात्पर्य ४७ टक्के मते काँग्रेसप्रणीत समाजवाद आणि सेक्युलॅरिझमच्या विरोधात गेली. निम्म्या महाराष्ट्राने राष्ट्रीय हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. महाराष्ट्राचा हा वैचारिक भूमिकेतील बदल मूलगामी आहे. परंतु, त्याची दखल राजकीय विश्लेषकांनी तशी घेतली नाही. प्रस्थापित राजकीय विश्लेषक स्वतःला पुरोगामी म्हणवतात. आपण जे बोलतो तोच समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता असा त्यांचा गैरसमज आहे. य मंडळींना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेले जनमताचे वास्तव अद्याप पचलेले नाही. त्यामुळे त्यांनी ते झाकण्याचा प्रयत्न चालवला आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा हिशेब पाहिला तर भाजपाच्या १२३ व शिवसेनेच्या ६३ अशा १८६ जागा राष्ट्रीय हिंदुत्वासाठी काम करणाऱ्यांनी जिंकल्या. याचा अर्थ दोन तृतियांशपेक्षा अधिक महाराष्ट्राने काँग्रेसी छापाचा भोंगळ समाजवाद आणि ढोंगी सेक्युलॅरिझम नाकारला. जनादेशाचा हा अर्थ विस्ताराने चर्चेत आला पाहिजे.

आता सरकार स्थापन होऊन विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. त्याचे भान ठेऊन आमच्या सरकारने कामाला सुरुवात केली आहे. व्यावसायिक परवाने तीन दिवसात मिळाले पाहिजेत, यासारख्या प्रशासकीय सुधारणा सुरू झाल्या आहेत. सरकारी नोकरांच्या बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. वर्षानुवर्षे जे अधिकारी मंत्रालयात मंत्र्यांच्या केबीनमध्ये अड्डे ठोकून बसले होते त्यांना बाहेर काढले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रशाकीय मंडळे बरखास्त करून त्यांच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्याचा मार्ग मोकळा केला. महाविद्यालयीन निवडणुकांच्या बाबतीत निर्णय घेतला. असे एक ना अनेक महत्त्वाचे निर्णय अवघ्या पंधरा दिवसात घेऊन आमच्या सरकारने काम करायला सुरुवात केली आहे. आता कसोटी इतरांची आहे. वरील सर्व निर्णय किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये घेतले जाणारे असे अनेक निर्णय हे महाराष्ट्रातील जनतेच्या फायद्याचे आहेत का नाही याचा विचार इतरांनी करायचा आहे. सरकारमध्ये सामील होणार की नाही यावर रोज छापा काटा खेळत बसलेल्या मंडळींनी त्यांना महाराष्ट्राचे भले कशात दिसते याचे उत्तर दिले पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी कामाला सुरुवात केली आहे. बरोबर यायचे की नाही याचा निर्णय इतरांनी करायचा आहे.

राज्यातील भाजपा सरकारचे यापुढचे पाऊल भ्रष्टाचारविरोधातील लढाई असेल. मागील सरकारमधील काही व्यक्तींनी केलेल्या भ्रष्टाचारावर कारवाईची भूमिका घेऊन आम्ही सत्तेत आलो. आता भ्रष्टाचारावरील कारवाई सुरू केल्यावर जे लोक विरोधात उभी राहतील किंवा अस्मितेच्या नावाखाली साथ द्यायला नकार देतील, ते सर्वजण मागील सरकारमधील व्यक्तींच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक असतील.

1 comment:

  1. माधव राव ,
    तुमच्या म्हणण्या प्रमाणे 47 % जनतेने मते काँग्रेसप्रणीत समाजवाद आणि सेक्युलॅरिझमच्या विरोधात गेली. निम्म्या महाराष्ट्राने राष्ट्रीय हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली.
    असे कसे ? तुम्ही आणि शिवसेनेने फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली का ?
    आणि तुमच्या ह्याच तर्काप्रमाणे 53% जनतेने मते काँग्रेसप्रणीत समाजवाद आणि सेक्युलॅरिझमच्या स्वीकारला असे नाही का ?
    -विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा हिशेब पाहिला तर भाजपाच्या १२३ व शिवसेनेच्या ६३ अशा १८६ जागा राष्ट्रीय हिंदुत्वासाठी काम करणाऱ्यांनी जिंकल्या.
    माधव राव ,
    वरील पैकी कॉंग्रेस , राष्ट्रवादी व इतर पक्षातील किती जन तुमच्या पक्षात येवून निवडून आले ते सांगा.म्हणजे त्यांची संख्या वजा करायला.
    माधव राव ,
    आपल्याला एक अनाहूत सल्ला देतो॰कृपा करून हिंदुत्वाचा मुद्दा लगेच पुढे करू नका.तुम्हाला जनतेने विकासावर निवडून दिले आहे.त्या पेक्षा महत्वाचे म्हणजे मागील सरकारच्या वाईट कामगिरी मुळे तुम्हाला ही संधि मिळाली आहे.
    आधी दोन चार वर्षे विकास करा आणि मग हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणा.नाही तर जनता तुम्हाला देहली प्रमाणे जागा दाखविल.

    ReplyDelete